(दापोली / वार्ताहर)
दापोली-हर्णे मार्गावरील गिम्हवणे येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर २६ ऑक्टोबर रोजी रात्री दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत दुर्वांग राजेंद्र यादव (रा. गिम्हवणे) आणि संकेत देवळेकर (रा. खेड) हे दोघे जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दापोली पोलीस ठाण्यात रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर एमएच.०८. जे. २९५२ क्रमांकाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल अपघातग्रस्त अवस्थेत आढळली. दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडले होते.
पोलिसांनी तातडीने दोन्ही जखमींना आपल्या वाहनातून दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले.
दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दापोलीच्या दिशेने येत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी पेट्रोल पंपासमोरील मारुती मंदिराजवळील कठड्यालगत असलेल्या लोखंडी अँगलवर आदळली. या अपघाताचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बुरोंडकर करीत आहेत.


