( खेड / वार्ताहर )
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड शहरातील सखल भाग जलमय झाले असून हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. वाढत्या पुराच्या पाण्यामुळे खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. सायंकाळपर्यंत नदीची पाणीपातळी तब्बल ९.८० मीटर इतकी नोंदविण्यात आली. नदीच्या पाण्याने खेड शहरातील मटण-मच्छी मार्केट, तीनबत्ती नाका, वाल्की गल्ली, निवाचा चौक, पान गल्ली आणि पोत्रिक मोहल्ला या सखल भागांना वेढा घातला. पाणी बाजारपेठेत शिरताच व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अनेकांना आपला माल सुरक्षित ठिकाणी हलविण्याचीही संधी मिळाली नाही.
संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासनाने सकाळपासून तीन वेळा सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहनही करण्यात आले.
नारंगी नदीच्या पुरामुळेही तालुक्यातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सुर्वे इंजिनिअरिंगजवळील नवीन मोरी पाण्याखाली गेल्याने खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच खेड-खाडीपट्टा आणि सुसेरी मार्गावरील पुलांवरूनही पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पूराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून स्मशानभूमी, वीटभट्ट्या आणि इतर मालमत्तेलाही फटका बसला आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूरस्थितीचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही झाला आहे. एसटी महामंडळाने मुंबई-बोरिवलीसह ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरही काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून खांबतळे झोपडपट्टीतील ४५ नागरिकांचे सम्राट अशोक नगर येथील बालवाडी इमारतीत सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने आपली यंत्रणा सतर्क ठेवली असून नागरिकांनी नदी, ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

