(मेरठ / वृत्तसंस्था)
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित ‘ब्लू ड्रम’ हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण निकाल देत मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांना मृत्युदंडाची (फाशी) शिक्षा सुनावली. मुस्कानने पती सौरभ राजपूत याची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या दोघांवर होता. जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निकाल दिला. यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने दोघांना हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते.
मार्च २०२५ मध्ये मेरठमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने देशभरात खळबळ उडवली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ३ मार्च २०२५ रोजी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांनी सौरभ राजपूत याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिकच्या निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ड्रममध्ये सिमेंट भरल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी सुमारे १३ महिने चालली. सरकारी पक्षाने २२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही आरोपींना दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाने शिक्षेवर सुनावणी घेतली आणि १४ ऑक्टोबर रोजी मृत्युदंडाची घोषणा केली. सरकारी पक्षाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघांनाही कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. मृत्युदंडासोबतच दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना मृत्युदंडासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार ५० हजार आणि २० हजार रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, अशा गंभीर गुन्ह्यांचा समाजावर आणि सामाजिक रचनेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आरोपींची पार्श्वभूमी आणि समाजाचे हित लक्षात घेऊन योग्य समतोल राखत शिक्षा ठरवणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे.
शिक्षा सुनावण्यापूर्वी तुरुंगात असलेल्या मुस्कान आणि साहिल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन कार्यवाहीत सहभागी करण्यात आले. शिक्षा काय असावी, असे न्यायाधीशांनी मुस्कानला विचारले असता तिने आपल्या मुलींची काळजी घेतली जावी, अशी विनंती केली. त्यानंतर ती शांत झाली. साहिलला हाच प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्याने उत्तर दिले नाही. शिक्षा जाहीर झाल्यानंतर दोन्ही आरोपी भावूक झाले आणि हमसाहमशी रडू लागले.
निकालानंतर सौरभ राजपूतच्या आईला अश्रू अनावर झाले. त्यांना अखेर शांतपणे न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सौरभचा भाऊ बबलू यानेही निकालाबद्दल समाधान व्यक्त केले. सुरुवातीपासूनच दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी कुटुंबाची मागणी होती आणि ती पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे त्याने सांगितले. आरोपींनी पुढील कायदेशीर प्रक्रिया किंवा अपील केल्यास त्याला कायदेशीर मार्गाने विरोध करू, असेही बबलूने स्पष्ट केले. आरोपी महिलेशी कोणताही संबंध ठेवण्याची किंवा तिला पुन्हा स्वीकारण्याची कुटुंबाची इच्छा नसल्याचे त्याने सांगितले. डीएनए चाचणीसाठी दबाव आणला तरी कुटुंब त्यास नकार देईल, असेही त्याने नमूद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर मृतदेह बाथरूममध्ये नेण्यात आला आणि त्याचे तुकडे करण्यात आले. घरातील खोली ब्लीचिंग पावडरने धुऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ४ मार्च रोजी मुस्कानने बाजारातून ड्रम खरेदी केला आणि त्यात मृतदेहाचे तुकडे ठेवून सिमेंट भरले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कटरच्या साहाय्याने ड्रम कापून मृतदेह बाहेर काढला आणि मुस्कान व साहिलला ताब्यात घेतले. मृतदेहाचे तुकडे १५ होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
मुस्कान रस्तोगी २७ वर्षांची असून, २०१६ मध्ये तिचे सौरभ राजपूतशी लग्न झाले होते. या विवाहाला दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. लग्नानंतर सौरभने मुस्कानसाठी आपल्या कुटुंबीयांना सोडले होते आणि दोघे मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. २०१९ मध्ये मुस्कानने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला याच्याशी पुन्हा भेट झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मुस्कान आणि साहिल आठवीपर्यंत एकाच वर्गात शिकत होते.


