(पुणे)
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीने नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या तालुक्यांत बिबट्याचे प्रमाण चिंताजनक वाढले असून हा परिसर आता ‘बिबट्या हॉटस्पॉट’ बनला आहे. गेल्या काही दिवसांत वन विभागाने टोकाची भूमिका घेत येथे बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश दिले असले, तरी ग्रामस्थांच्या मनातील भीती अजूनही कायम आहे.
शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थ रात्रीच नव्हे तर दिवसा देखील भीतीच्या छायेत जगत आहेत. सध्या शेतीकामाचा हंगाम सुरू असल्याने महिलांनाही शेतात जावेच लागते. अशावेळी अनेकदा बिबट्या शेतात बांधावर आढळून येतो. बिबट्याच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील महिलांनी अनोखा उपाय शोधला आहे, त्यांनी गळ्यात टोकदार खिळ्यांचे पट्टे घालण्यास सुरुवात केली आहे.
बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करत नरडीचा घोट घेत असल्याने, स्वतःचा बचाव व्हावा म्हणून या महिलांनी कुत्र्यांसारखे खिळ्यांचे पट्टे वापरण्याचा निर्णय घेतला. “शेतात काम करणे हेच उपजीविकेचे साधन आहे, पण वनविभाग आणि सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी ठरत आहेत,” असे ग्रामस्थांनी सांगितले.
मागील दोन वर्षांपासून या भागात बिबट्यांच्या हल्ल्यांत अनेक शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी आणि कुत्रे असे पाळीव प्राणी ठार झाले आहेत. काही ठिकाणी महिलांवर आणि लहान मुलांवरही प्राणघातक हल्ले झाले आहेत. अलीकडेच पिंपरखेड येथील रोहन बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले, त्यानंतर वन विभागाने त्या बिबट्याला शोधत ठार केले होते.
वन विभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावले असले तरी त्यामध्ये बिबट्या न अडकणे, भक्षाचा अभाव आणि वाढती संख्या यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीसोबतच संतापही वाढत आहे. “मनुष्यहानी होऊ नये म्हणून तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि बिबट्यांसाठी पिंजरे वाढवावेत,” अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

