(नाशिक / वृत्तसंस्था)
प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा नीलेश जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. डॉ. मनीषा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर आता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने डॉ. स्वाती चव्हाण यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन हायप्रोफाईल डॉक्टरांना अटक झाल्याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रासह शहरात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकमधील गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च रोजी ४० वर्षीय डॉ. मनीषा जेजुरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीच्या आधारे डॉ. मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, २०२१ पासून डॉ. नीलेश हे त्यांच्या सहकारी महिला डॉक्टरच्या सल्ल्याने वागत होते आणि पत्नीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. तसेच डॉ. नीलेश यांचे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांच्याशी काहीतरी कनेक्शन असल्याचा आरोप मनीषा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणात डॉ. नीलेश जेजुरकर यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून मिळालेली माहिती तसेच इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी डॉ. स्वाती चव्हाण यांना अटक केली. डॉ. नीलेश आणि डॉ. स्वाती यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांना होता. यापूर्वी डॉ. स्वाती यांची सलग नऊ वेळा पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद डॉ. स्वाती चव्हाण यांचे वकील ॲड. अविनाश भिडे यांनी केला आहे.
फिर्यादीत आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात संबंधित महिला डॉक्टरने डॉ. मनीषा यांना फोन करून, ‘तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे, तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस,’ असे म्हणत त्यांना हिणवले आणि मानसिक छळ केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचे मनीषा यांच्या माहेरच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही व्हिडिओ तसेच मोबाईलमधील डेटा रिकव्हरी झाल्यानंतर दोघांमधील नेमके संबंध काय होते, तसेच डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला, याबाबत खुलासा होईल, अशी प्रतिक्रिया मनीषा यांच्या माहेरच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासात डॉ. नीलेश आणि डॉ. मनीषा यांच्यात सातत्याने कोणत्या कारणांवरून वाद होत होते, याचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर डॉ. मनीषा यांच्या आत्महत्येच्या वेळी डॉ. स्वाती घटनास्थळी नेमक्या काय करत होत्या, त्यांचे डॉ. मनीषा यांच्याशी नेमके काय संबंध होते आणि कोणत्या कारणासाठी त्यांचा वारंवार छळ केला जात होता, या मुद्द्यांचाही तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि पोलीस तपासातून समोर येणाऱ्या बाबींच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. नीलेश जेजुरकर यांनी अटक टाळण्यासाठी प्रथम मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट १ ने डॉ. नीलेश यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. न्यायालयाने त्यांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.


