(ठाणे / वृत्तसंस्था)
घोडबंदर परिसरातील शिवसेना (ठाकरे गटाचे) पदाधिकारी तथा मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर विभागाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (वय ४७) यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मनोरमानगर येथील पक्षाच्या शाखेसमोर रात्री ९:३० ते ९:४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोराने दोन फैरी झाडल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून 5 आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना स्थानिकांनी कापूरबावडी भागातील आर मॉलजवळील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पहिला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या फुटेजमध्ये चेहऱ्याला रुमाल बांधलेले दोन व्यक्ती दुचाकीवरून प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. या प्रकरणात निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती अशा एकूण पाच संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. यापैकी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
प्रदीप पूर्णेकर हे घोडबंदर परिसरातील मानपाडा भागाचे माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे भाऊ होते. मंगळवारी रात्री ते कार्यालयात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दोन गोळ्या लागल्यानंतर ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पूर्णेकर यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने गोळीबार कोणत्या कारणासाठी केला, याचा तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी वडिलांना मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. राजेंद्र शिंदे यांनी बैठक घेऊन हे सर्व घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला. “वडिलांना न्याय मिळेपर्यंत मी पोलीस स्थानकातून हलणार नाही,” अशी भूमिका राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचे मोठे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनीही गंभीर आरोप केले आहेत. “गणपतीपासून हे सर्व सुरू होते. ते रेकी करत होते,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. या प्रकरणाचा पोलिसांनी क्लस्टरच्या अनुषंगानेही तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचेही जयनाथ पूर्णेकर यांनी सांगितले.
प्रदीप पूर्णेकर सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय होते. नशामुक्तीच्या उपक्रमांसह पोलिसांच्या विविध सामाजिक कार्यक्रमांत ते सहभागी होत होते. समाजमाध्यमांच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक विषयांवर आवाज उठवला होता. काॅक्रोज जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनातही त्यांनी दिल्ली येथे जाऊन सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या.
दरम्यान, ठाण्यात गेल्याच आठवड्यात चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर यांची एका मद्यपी सराईत गुन्हेगाराने दगडाने प्रहार करून हत्या केली होती. त्यानंतर आता राजकीय पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना घडल्याने ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


