(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे एकत्रीकरण करण्याचे नियोजन केले आहे. वर्षअखेरीपर्यंत राज्यभरात ४ हजार ५०० नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. या व्यवस्थेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
सध्या अपघात आणि गंभीर आजारांसाठी १०८ क्रमांकाची, तर गर्भवती महिला आणि बालकांसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. या दोन्ही सेवांमध्ये समन्वयाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा रुग्णवाहिका मिळण्यास विलंब होतो. ही समस्या दूर करण्यासाठी दोन्ही सेवांचे एकत्रीकरण करून एकाच मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून कॉलचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर संबंधित ठिकाणाच्या जवळ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तातडीने पाठवण्याची व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
नवीन रुग्णवाहिकांमध्ये प्रगत जीवनरक्षक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. यामध्ये ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट (ALS) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) प्रकारच्या रुग्णवाहिकांचा समावेश असेल. या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीशी जोडण्यात येणार असल्याने त्यांचे अचूक स्थान नियंत्रण कक्षाला समजू शकेल. परिणामी, गरज असलेल्या ठिकाणी सर्वांत जवळची उपलब्ध रुग्णवाहिका पाठवणे आणि रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचवणे अधिक सुलभ होईल.
राज्यातील ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांमध्येही या सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. अपघात, हृदयविकाराचे झटके आणि अन्य गंभीर वैद्यकीय परिस्थितींमध्ये उपचारासाठीचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या कालावधीत उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचवण्याची शक्यता वाढते. रुग्णवाहिका सेवांच्या एकत्रीकरणामुळे मदत पोहोचण्याचा कालावधी कमी करण्यास मदत होईल. विशेषतः दुर्गम भागातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात सुरक्षितपणे पोहोचवणे आणि गंभीर रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे सुलभ होणार आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होईल. वर्षअखेरीपर्यंत ४ हजार ५०० अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन असून, जीपीएस प्रणाली, जीवनरक्षक उपकरणे आणि एकात्मिक नियंत्रण कक्षाच्या मदतीने संपूर्ण राज्यात तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. या व्यवस्थेमुळे महाराष्ट्राची आपत्कालीन आरोग्य सेवा देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


