(उल्हासनगर / ठाणे )
उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील लालचक्की रस्त्यावर रिक्षांच्या रांगेजवळ बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. कॅम्प क्रमांक ४ मधील उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेर पायी आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी हरेश ऊर्फ शांती गजवानी यांच्यावर गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली. रेल्वे स्थानकासारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या गोळीबाराच्या थरारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली. या गोळीबारात हरेश गजवानी ऊर्फ शहाणी यांचा मृत्यू झाला. डोक्यात दोन गोळ्या लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अविनाश नायडू याने हरेश गजवानी यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हरेश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रावर गोडसे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या पथकानेही घटनास्थळी दाखल होत समांतर तपास सुरू केला आहे.
या हत्येमागे चार वर्षांपूर्वी घडलेल्या एका हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. चार वर्षांपूर्वी अविनाश नायडू याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या प्रकरणात हरेश गजवानी आरोपी होता. त्यामुळे या जुन्या प्रकरणातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून हत्या झाली आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
गोळीबाराचे नेमके कारण काय, हत्येसाठी कोणत्या शस्त्राचा वापर करण्यात आला आणि संशयित आरोपीचा शोध कुठपर्यंत पोहोचला आहे, याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


