(सातारा)
महामार्गावर कार अडवून एका सराफ व्यावसायिकाला मारहाण करत २० लाख रुपयांची रोकड लुटून पलायन करणाऱ्या १२ जणांच्या दरोडेखोर टोळीपैकी ७ जणांना सातारा पोलिसांनी केरळमध्ये अटक केली आहे. या कारवाईत एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली. उर्वरित पाच आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या टोळीवर देशभरात गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून, केरळ आणि तामिळनाडूमध्ये हे सर्वजण ‘वॉन्टेड’ आहेत.
दरोडा घालणारी ही टोळी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नंदकुमार नारायणस्वामी, अजिथ कुमार, सुरेश केसावन, विष्णू कृष्णकुट्टी, जिनू राघवन, कलाधरन श्रीधरन आणि विनीथ उर्फ राजन राधाकृष्ण यांचा समावेश आहे. सातारा पोलिसांच्या विशेष पथकाने केरळ पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ, इनोव्हा आणि स्विफ्ट कारही जप्त करण्यात आल्या आहेत.
दरोड्याची थरारक घटना
१२ जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास, सोने-चांदी व्यावसायिक विशाल पोपट हासबे (रा. हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली) हे पुण्याकडे जात असताना, भुईज (ता. वाई) गावच्या हद्दीत तीन वाहनांतून आलेल्या संशयितांनी त्यांच्या ह्युंदाई कारला अडवले. लोखंडी रॉडने काचा फोडत, चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली आणि २० लाख रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर फिर्यादीसह कार अपहरण करून त्यांना सर्जापूर फाटा (ता. जावळी) येथे सोडून टोळीने पलायन केले.
घटनेनंतर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत नाकाबंदी लावण्यात आली. सांगली पोलिसांनी विटा-तासगाव मार्गावर संशयित वाहन अडवून विनीथ राधाकृष्ण याला अटक केली. त्याच्याकडून लपवलेली लुटीची रोकड हस्तगत करण्यात आली. सातारा एलसीबीचे निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक निरीक्षक रोहित फार्णे, भुईंजचे सहाय्यक निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे उर्वरित आरोपींचा मागोवा घेतला.
धक्कादायक मोडस ऑपरेंडी
या टोळीच्या कार्यपद्धतीने पोलिसही चकीत झाले आहेत. हवालामार्गे रोख व्यवहार करणाऱ्या कुरिअर कंपन्यांची वाहने आणि सराफ व्यावसायिकांची वाहने लक्ष्य करून लूट करणे ही त्यांची खास मोडस ऑपरेंडी आहे. अनेक प्रकरणांत पीडितांनी भीतीपोटी व आपल्या गोपनीय व्यवहारांमुळे तक्रार न केल्यामुळे गुन्हे नोंदले गेलेले नाहीत. याच टोळीने जानेवारी महिन्यातही फिर्यादीच्या गाडीवर कर्नाटकात दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.

