(मुंबई)
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड जाहीर करण्यात आली असून, शिवसेना (शिंदे गट)चे नेते संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे तब्बल २९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेला भाजपचा महापौर मिळणार आहे.
रितू तावडे या भाजपच्या अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेविका आहेत. त्यांनी २०१२ मध्ये घाटकोपर प्रभाग क्रमांक १२१ मधून प्रथमच निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यानंतर २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १२७ आणि आताच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३२ मधून त्या विजयी झाल्या आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे.
आज सकाळी मुंबई महापालिका मुख्यालयात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नेत्यांची महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सत्तेचे अंतिम समीकरण आणि पदांचे वाटप निश्चित करण्यात आले. बैठकीला भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश खणकर, तर शिवसेना (शिंदे गट)कडून राहुल शेवाळे आणि गटनेते अमेय घोले उपस्थित होते.
महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट)ची भूमिका महत्त्वाची राहिल्याने उपमहापौरपद त्यांना देण्यात आले. सुरुवातीला या पदासाठी शीतल म्हात्रे आणि अमेय घोले यांची नावे चर्चेत होती. मात्र अखेर संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम:
मुंबई महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीसाठीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. इच्छुक उमेदवारांना आज ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिका मुख्यालयातील सभागृहात विशेष सभा घेण्यात येईल. दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन मुंबईच्या नव्या महापौरांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

