(सोलापूर / वृत्तसंस्था)
सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात रविवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली. 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख वर्षा पांडुरंग अधटराव (वय 33) आणि स्वरा पांडुरंग अधटराव (वय 14, दोघी रा. सुशील नगर, सोलापूर) अशी झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 6 वाजता सोलापूर-टिकेकरवाडी रेल्वे मार्गावरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक 458/3C जवळ आई आणि मुलगी गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या आढळल्या. रेल्वे ट्रॅकवर अपघात झाल्याची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल जी. एस. मणुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दोघींनाही त्वरित श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघींनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
वादानंतर माहेरी सोडले, काही तासांत आई-मुलीने उचलले टोकाचे पाऊल
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफूल परिसरातील पांडुरंग आधटराव यांचा विवाह वर्षा वाघमारे यांच्याशी झाला होता. पांडुरंग हे खासगी कंपनीत (डी-मार्ट) काम करत आहेत. वर्षा या पांडुरंग यांच्या आत्याच्या मुलगी होत्या. वर्षाच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाल्याने त्या माहेरी आल्यावर नेहरू नगर येथील डी.एड. कॉलेजजवळील सुशील नगर परिसरात आपल्या मावशीकडे राहत असत.
शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पांडुरंग यांनी पत्नी वर्षा आणि मोठी मुलगी स्वरा हिला मावशीच्या घरी सोडले आणि स्वतः सैफूल येथील घरी परतले. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास वर्षा आणि स्वरा मावशीच्या घरातून बाहेर पडल्या. दोघीही आसरा ब्रिज परिसरातून रेल्वे रुळाच्या दिशेने चालत गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पहाटे साडेचारच्या सुमारास रेल्वे पोलिसांना रेल्वे रुळावर दोन जण पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलिसांना कळवले. हवालदार जी. एस. मणुरे घटनास्थळी पोहोचले आणि दोघींची ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर दोघींनाही रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वर्षा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा सर्व बाजूंनी तपास पोलीस करत आहेत.
लहान मुलगी घरीच झोपलेली होती
शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद सुरू असताना मोठी मुलगी स्वरा जागी होती, तर धाकटी मुलगी घरात झोपलेली होती. वादानंतर पांडुरंग यांनी पत्नी वर्षा यांना माहेरी सोडण्यासाठी नेले असता स्वरा देखील आईसोबत गेली. दुर्दैवाने, त्याच रात्री घडलेल्या या घटनेत आईसोबत स्वराचाही मृत्यू झाला, तर घरात झोपलेली धाकटी मुलगी मात्र बचावली.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, आई आणि मुलीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत तपास सुरु आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मृत्यूमागील कारणांचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

