(रायगड / उरण)
विदेशातून ‘बाटली आणि वॉलपेपर’ या बनावट नावाखाली जेएनपीए बंदरात पाठविण्यात आलेल्या कंटेनरमधून तीन कोटी रुपये किमतीचा दहा टन वजनाचा १९८०० नग प्रतिबंधित फटाक्यांचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी जप्त केला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
या कंटेनरबाबत अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तो ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. घोषित मालाच्या पहिल्या तीन रांगा वगळता कंटेनरमध्ये प्रामुख्याने प्रतिबंधित फटाके आढळून आले. त्यानंतर सीमाशुल्क कायदा, १९६२ मधील तरतुदींनुसार घोषित केलेल्या छुप्या मालासह फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला.
अवैधरित्या फटाक्यांची आयात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला याच कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.


