(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि सोनवी या दोन नद्यांच्या निसर्गरम्य संगमावर वसलेल्या नावडी नगरीत श्री निनावी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात आकर्षक रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा गजर, सामूहिक आरत्या, भजनांचे सूर आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
नावडीतील श्री निनावी, वाघजाई, विठलाई आणि वरदानी मानाई ही ग्रामदैवते श्रद्धेची प्रमुख केंद्रे आहेत. या देवतांच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी सुरू असून, घटस्थापना, महापूजा, सामूहिक आरत्या आणि अखंड नामस्मरणाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. ढोल-ताशांचा निनाद, टाळ-मृदुंगाची साथ आणि केशरी गुलालाच्या उधळणीमुळे उत्सवाची रंगत अधिकच वाढली आहे. मंदिर परिसरात करण्यात आलेली नेत्रदीपक रोषणाई आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशाने सायंकाळच्या वेळी संपूर्ण परिसर उजळून निघत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीनेही उत्सवात आकर्षक भर पडत आहे.
या नवरात्रोत्सवाला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा लाभली असून, सुर्वे घराण्याने श्रद्धा आणि समर्पणातून ही परंपरा सातत्याने जपली आहे. स्व. किसन हरिश्चंद्र सुर्वे यांनी तब्बल ६५ वर्षे मानकरी म्हणून सेवा बजावली. त्यांचा वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र दत्ताराम उर्फ बावा सुर्वे हे गेल्या ३९ वर्षांपासून श्री निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष आणि मानकरी म्हणून सेवा करीत आहेत. सुर्वे कुटुंबीयांच्या दोन पिढ्यांनी दिलेले हे दीर्घकालीन योगदान नावडीवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरले आहे.
श्री निनावी देवी प्रासादिक मंडळाच्या वतीने आयोजित या उत्सवात भंडारी, तेली आणि नाभिक ज्ञाती बांधवांसह स्थानिक मित्रमंडळे व ग्रामस्थ सक्रिय सहभाग घेत आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळे उत्सवातून सामाजिक एकोपा आणि सामूहिक सेवेची भावना अधोरेखित होत आहे. दररोज रात्री महाआरतीनंतर देवीच्या जयघोषात आणि पारंपरिक भोवत्यांच्या तालावर भाविक भक्तिभावाने सहभागी होतात. हजारो भक्त देवीच्या चरणी नृत्यसेवा अर्पण करतात. त्यानंतर विविध भजनी मंडळांच्या सिंगल बारी आणि डबल बारी भजनांना सुरुवात होते. पहाटेपर्यंत रंगणाऱ्या या भजनांच्या जुगलबंदीत टाळ, मृदंग आणि विणेच्या साथीने हरिनामाचा गजर सुरू असतो. त्यामुळे संपूर्ण नावडी नगरी भक्तिमय वातावरणाने भारून जाते.
या उत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माहेरवाशिणींचे आपल्या मूळ गावी होणारे आगमन. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून माहेरवाशिणी श्री निनावी देवीच्या दर्शनासाठी, ओटी भरण्यासाठी आणि माहेरच्या मातीशी असलेले नाते जपण्यासाठी नावडीमध्ये दाखल झाल्या आहेत. वर्षभरानंतर नातेवाइकांच्या भेटीचा आनंद आणि देवीच्या दर्शनाची ओढ यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. माहेरवाशिणींच्या उपस्थितीने उत्सवाला कौटुंबिक जिव्हाळ्याची किनार लाभली आहे.
उत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मानकरी दत्ताराम उर्फ बावा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मंडळी चोवीस तास सेवेत कार्यरत आहेत. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश केणी आणि त्यांचे सहकारी यांचेही उत्सवासाठी सहकार्य लाभत आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी उत्साहात होणार असून, सोमवारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी आणि माहेरवाशिणींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री निनावी देवी प्रासादिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


