(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस ग्रामपंचायतीच्या अनागोंदी आणि बेफिकीर कारभाराबाबत प्रसारमाध्यमांतून वारंवार प्रश्न उपस्थित करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी गावाच्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य पंपगृहाच्या दुरवस्थेचे व्हिडिओ आणि छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध झाले होते. या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतरही पंपगृहाची अवस्था ‘जैसे थे’ असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक योजनेच्या पंपगृहाचा दरवाजा मोडकळीस आलेला असून, त्याला साधे कुलूपही नसल्याचे निदर्शनास आले आहे. सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात आहे. कुलूप नसल्यामुळे पंपगृहात अनधिकृत प्रवेश होण्याची शक्यता असून, पंपाचा अनधिकृत वापर होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे, तर पंपगृहाच्या सुरक्षेसाठी साधे कुलूप लावण्याचीही ग्रामपंचायतीला गरज वाटत नाही का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
पंपाचा अनधिकृत अथवा अनियंत्रित वापर झाल्यास पाण्याचा अतिरिक्त उपसा होण्यासोबतच वीज वापर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी ग्रामपंचायतीवर वाढीव वीजबिलाचा आर्थिक भार पडू शकतो. हा खर्च अखेरीस ग्रामपंचायतीच्या निधीतून म्हणजेच जनतेच्या पैशांतूनच होणार असल्याने, सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
दरम्यान, मोडकळीस आलेल्या दरवाजामुळे पंपगृहात साप, विंचू यांसारखे विषारी जीव शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंपगृहात काम करणारे कर्मचारी किंवा अन्य व्यक्ती तेथे गेल्यास त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने दरवाजा दुरुस्त करून पंपगृहाला सुरक्षित कुलूपबंद व्यवस्था करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांनी व्हिडिओ आणि छायाचित्रांसह पंपगृहाची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही परिस्थिती कायम राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, पाणीपुरवठा यंत्रणेची सुरक्षितता आणि ग्रामपंचायतीच्या निधीचा योग्य वापर याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्रसारमाध्यमांतून पुराव्यांसह प्रश्न उपस्थित करूनही संबंधित यंत्रणा कारवाई करत नसेल, तर ग्रामपंचायतीच्या कारभारावर देखरेख कोणाची, असा सवाल आता फुणगूसमधून उपस्थित होत आहे. पंपगृहाचा दरवाजा तातडीने दुरुस्त करून कुलूपबंद व्यवस्था करावी आणि पाणीपुरवठा यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

