(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पुणे येथील ख्यातनाम स्पेस टॉक स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिलिंद चिंगळे यांनी कुटुंबीयांसमवेत व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कला दालनाला भेट देत संस्थेच्या कला विषयक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. यावेळी पैसा फंड इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मिलिंद चिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांची स्थापत्यविशारद कन्या, पत्नी, अन्य कुटुंबीय तसेच प्रशालेचे सेवक अनंत जाधव उपस्थित होते.
भेटीदरम्यान चिंगळे यांनी कला विभागाने उभारलेल्या ९ फूट उंच पेन्सिलच्या प्रतिकृतीची आणि त्यासमोरील आकर्षक चित्रकृतीची पाहणी केली. तसेच सन २००८-०९ पासून सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र कलावर्गाची आणि त्यानंतर विकसित करण्यात आलेल्या कला दालनाची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांच्या कलाविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.
गेल्या २६ वर्षांपासून प्रकाशित होणारे ‘कलासाधना’ हे चित्रकला वार्षिक पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी चित्रकला क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय असून ती प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
पैसा फंड कला दालन हे चित्रकार पाथरे यांच्या कलाकृतींनी समृद्ध झाले असल्याचे सांगत, भविष्यात दालनात प्रदर्शित होणाऱ्या चित्रांना अत्याधुनिक पद्धतीने फ्रेमिंग करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यापारी पैसा फंड संस्था सातत्याने करत असलेल्या कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी मिलिंद चिंगळे यांच्या चिरंजीवांनी साकारलेली तीन चित्रे कला दालनात प्रदर्शित करण्यात आली असून त्यांचीही त्यांनी व कुटुंबीयांनी आवर्जून पाहणी केली.
या भेटीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर आणि पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी मिलिंद चिंगळे व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

