(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील पत्रकार तथा बौद्धाचार्य वैभव पवार यांचे विशेष धम्मप्रवचन रविवार, १८ ऑक्टोबर रोजी करबुडे कपिलवस्तूनगर येथील संबोधी बुद्धविहारात आयोजित करण्यात आले आहे. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३८, मौजे करबुडे कपिलवस्तूनगर यांच्या वतीने सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा धार्मिक प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा, रत्नागिरी आणि संस्कार समिती, रत्नागिरी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाची तयारी करबुडे गाव शाखेकडून करण्यात आली आहे. दरवर्षी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा आणि संस्कार समितीच्या वतीने तालुक्यातील विविध गावशाखांमध्ये वर्षावास कार्यक्रमांतर्गत धम्मप्रवचनांची मालिका आयोजित केली जाते. यंदाही तालुक्यातील विविध गावांमध्ये ही प्रवचनमालिका पार पडली असून, या मालिकेतील अंतिम धम्मप्रवचन करबुडे गाव शाखेत होणार आहे.
या प्रवचनात बौद्धाचार्य वैभव पवार हे ‘बौद्ध धम्मातील संस्कारांचे महत्त्व आणि बौद्धधर्मीयांची जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. गतवर्षी त्यांनी कोतवडे गाव शाखेत उत्तम प्रकारे धम्मप्रवचन केले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी वर्षावास धम्मप्रवचनमालिकेअंतर्गत त्यांना प्रवचनाची संधी देण्यात आली आहे.
करबुडे गाव शाखेचे अध्यक्ष संतोष कृष्णा जाधव यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष नथुराम हिरू जाधव आणि आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा रोशनी राजकुमार जाधव यांच्यासह स्थानिक तसेच मुंबई मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी आणि सभासद बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत.
तसेच बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष तथा संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत आणि संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार यांच्यासह तालुका शाखेच्या अंतर्गत असलेल्या सर्व उपसमित्यांचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य, श्रामणेर, बौद्धाचार्य, गाववार प्रतिनिधी आणि धम्मबांधवांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या धम्मप्रवचन कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करबुडे गाव शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव आणि तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केले आहे.


