(खेड / वार्ताहर)
सेवा संकल्प अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित खेड तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत बिजघर नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. मोठ्या गटातील वक्तृत्व स्पर्धेत शुभ्रा भगवान जंगम हिने प्रथम क्रमांक, तर निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. लहान गटातील वक्तृत्व व निबंध स्पर्धेत शौर्य मंगेश मर्चंडे याने प्रथम क्रमांक पटकावला.
प्रत्येक प्रभागातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ही तालुकास्तरीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत शुभ्रा भगवान जंगम आणि शौर्य मंगेश मर्चंडे यांनी ओघवत्या भाषाशैलीत आपल्या विचारांची प्रभावी मांडणी केली. विषयाचा आशय स्पष्टपणे मांडत त्यांनी सादर केलेल्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सकपाळ आणि मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. खेड नं. १ शाळेत आयोजित या स्पर्धेचे नियोजन स्पर्धाप्रमुख केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर, केंद्रप्रमुख राहुल जाधव, दिप्ती यादव, रविंद्र देवळेकर आणि तृप्ती म्हात्रे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गायत्री माने, खोपी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी संदीप कंदूरकर, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड आणि पतपेढीचे माजी संचालक संतोष उतेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह शाळेचे अभिनंदन केले.


