(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे एकाच कुटुंबातील चार बालकांचा पाण्यात बुडून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील बेपत्ता चौथ्या मुलीचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेत तीन बालकांचे मृतदेह हाती आले असून, चौथ्या मुलीचा शोध अद्याप लागलेला नाही. या शोधमोहिमेसाठी शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. घटनेच्या चौथ्या दिवशीही वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले होते.
राजापूरचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार दिवसभर घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहिमेचा आढावा घेत होते. पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी राहून मोहिमेचे नियंत्रण केले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचे जवान शोधकार्यात तैनात करण्यात आले आहेत.
बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने विस्तीर्ण खाडी परिसरात हवेतून शोधमोहीम राबवली. पाण्यातील शोधकार्यासाठी मालवण आणि वेंगुर्ला येथून प्रशिक्षित कायाकिंग पथकांना पाचारण करण्यात आले असून, मोठ्या संख्येने स्कूबा डायव्हर्सच्या मदतीने खोल पाण्यात शोध घेतला जात आहे.
या कठीण प्रसंगी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यात सहभागी झाले आहेत. युवा नेत्या अपूर्वा सामंत यादेखील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, शोधमोहिमेसाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.
एकीकडे वरिष्ठ अधिकारी आणि विविध यंत्रणांकडून शोधमोहिमेसाठी व्यापक प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या सुरुवातीच्या संथ कारभाराबाबत ग्रामस्थांमधील नाराजी कायम आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली प्रशिक्षित यंत्रणा पहिल्याच दिवशी वेळेत घटनास्थळी पोहोचली नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. शोधकार्यात झालेल्या सुरुवातीच्या विलंबाबाबत स्थानिक पातळीवर रोषही व्यक्त होत आहे.
दरम्यान, बेपत्ता मुलीचा शोध लागून तिच्यावर अंतिम विधी करता यावेत, यासाठी कुटुंबीय प्रतीक्षा करत आहेत. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोधमोहिमेतील अडचणी आणि त्रुटी दूर कराव्यात, तसेच बेपत्ता मुलीचा शोध लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


