(राजापूर / प्रतिनिधी)
शहरातील वरचीपेठ भागात शुक्रवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन चालक प्रमोद पांडुरंग मांजरेकर (वय ५१) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रमोद मांजरेकर हे रोजप्रमाणे सकाळी कामासाठी ट्रॅक्टर घेऊन घरातून निघाले होते. मात्र, घरासमोरील तीव्र उतारावर ट्रॅक्टरवरील त्यांचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला आणि ते पुढच्या भागाखाली चिरडले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर घरच्यांनी आरडाओरड केली असता शेजारील नागरिकांनी धाव घेतली. तरुणांनी ट्रॅक्टर हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रमोद मांजरेकर हे प्रामाणिक, कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचे होते. काही काळ त्यांनी राजापूर नगर परिषदेत कंत्राटी चालक म्हणूनही सेवा दिली होती. त्यांच्या निधनाने पत्नी, दोन मुले, आई, भाऊ आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने राजापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.