(रत्नागिरी /प्रतिनिधी)
अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या मदतीसाठी पुढे येण्यास अनेक जण धजावत नसताना, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांनी मात्र क्षणाचाही विलंब न करता माणुसकीचे दर्शन घडविले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी येणारी रिक्षा थांबवली, सहकाऱ्यांच्या मदतीने जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या समयसूचकतेमुळे उपचारांची संधी मिळालेल्या मुकुंद विलणकर यांनी मृत्यूच्या संकटातून सावरत पुन्हा आपल्या घरी परतण्यापर्यंतचा प्रवास केला. जाधव यांच्या या संवेदनशील कृतीबद्दल विलणकर कुटुंबीयांनी त्यांचा कौटुंबिक सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी रत्नागिरीतील आठवडा बाजार परिसरात, रहाटकर एसटी स्थानकासमोर मोटारसायकल अपघातात मुकुंद विलणकर गंभीर जखमी झाले होते. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना मदत करण्यासाठी पुढे येण्यास अनेक जण कचरत होते. त्याच वेळी पेट्रोल पंपावरून बाहेर पडणारे राजू जाधव यांच्या नजरेस हा प्रकार पडला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूने जाणाऱ्या नागरिकांना मदतीचे आवाहन केले; मात्र सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीतही जाधव यांनी माघार घेतली नाही. त्यांनी एका रिक्षाला थांबवून त्यातील प्रवाशांना मदतीची विनंती केली. रोहन ठाकूर, शेलार आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींच्या सहकार्याने जखमी मुकुंद यांना रिक्षातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी परकार रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृतीच्या गांभीर्यामुळे त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथेही उपचारासाठी न्यावे लागले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने मुकुंद विलणकर सुखरूप रत्नागिरीतील आपल्या निवासस्थानी परतले आहेत.
मुकुंद विलणकर हे भाई विलणकर यांचे पुतणे असल्याचे त्यांना अपघातस्थळी चर्चेतून समजल्यानंतर जाधव यांनी त्यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. संकटकाळात अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी पुढे सरसावण्याची त्यांची ही कृती विलणकर कुटुंबासाठी मोलाची ठरली. जिल्हा परिषदेत अकाउंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले राजू जाधव अलीकडेच सेवानिवृत्त झाले असून, सध्या ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या जाधव यांच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे. या माणुसकीच्या ऋणाची जाणीव ठेवत विलणकर कुटुंबीयांनी राजू जाधव यांचा कौटुंबिक सत्कार केला. यावेळी भाई विलणकर, अण्णा विलणकर, मुकुंद विलणकर, अंशूक विलणकर, श्वेता विलणकर, गायत्री विलणकर, गंधार विलणकर आणि किशोर शिवलकर उपस्थित होते.
“माणुसकीच्या नात्याने माझे कर्तव्य पार पाडले. माझ्या मदतीचा वेळीच उपयोग झाला आणि मुकुंद विलणकर सुखरूप घरी परतले, यापेक्षा मोठा आनंद कोणता? हाच माझ्यासाठी खरा सत्कार आहे,” अशा शब्दांत राजू जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अपघातग्रस्तांना मदत करण्याबाबत समाजात असलेली भीती दूर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. “अपघातग्रस्ताला मदत केल्यामुळे आपल्याला त्रास होईल, या भीतीने मागे हटू नका. जखमी व्यक्तीला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळवून देणे महत्त्वाचे आहे. वेळेत उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते,” असे त्यांनी सांगितले. संकटाच्या क्षणी मदतीसाठी पुढे केलेला हात एखाद्याच्या आयुष्याला नवी संधी देऊ शकतो, याची प्रचिती राजू जाधव यांच्या कृतीतून आली. सत्काराच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे मूल्य जपणारी त्यांची ही कृती समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.


