(राजापूर)
कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड स्थानकावर मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीस आता गती मिळू लागली आहे. याबाबत तत्कालीन आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शिफारस केली आहे.
राजापूर रोड स्थानकावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने या दोन प्रमुख गाड्यांना या स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने होत आहे.
या मागणीस पाठबळ देण्यासाठी पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई) यांच्यातर्फे आमदार सदाभाऊ खोत यांना निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने खोत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधून पुढाकार घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय पातळीवर रेल्वेमंत्र्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी अधिकृत पत्र पाठवले आहे.
दरम्यान, या गाड्यांचा थांबा मंजूर होण्यासाठी पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या वतीने केंद्रीय रेल्वे विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती समितीचे प्रशासकीय प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी दिली. तसेच राजापूर रोड स्थानकासाठी आरक्षणाचा कोटा वाढवण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी हा थांबा मंजूर व्हावा, अशी अपेक्षा संपूर्ण राजापूर परिसरातून व्यक्त होत आहे.