(जाकादेवी / संतोष पवार)
मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि मालगुंड गावचे सुपुत्र सुनील उर्फ बंधू मयेकर यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा श्री. बा. कारखानीस पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या घोषणेसह त्यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी मालगुंड शिक्षण संस्थेच्या मालगुंड, जाकादेवी आणि काजुर्ली येथील तीनही विद्यालयांमध्ये विशेष गुणगौरव सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त प्रसिद्ध मालवणी व मराठी कवी गोविंद मधुकर मडकईकर (दादा) यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रमही होणार आहेत.
सत्कार समारंभाची सुरुवात सकाळी १० वाजता मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजच्या कै. सदानंद परकर सभागृहात होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता गुहागर तालुक्यातील कै. डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय, काजुर्ली येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या कै. प्रभावती मधुकर खेऊर सभागृहात गुणगौरव समारंभ पार पडणार आहे.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त या तीनही विद्यालयांमध्ये कवी गोविंद मडकईकर यांच्या मालवणी व मराठी काव्यवाचनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. साहित्य आणि वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सुनील मुरारी मयेकर यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. मालगुंड गावचे सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी दूरदृष्टीने अनेक लोकाभिमुख विकासकामे मार्गी लावली. नियोजनबद्ध कार्यपद्धती, प्रभावी अंमलबजावणी, दानशूरपणा आणि सेवाभावी वृत्ती ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये राहिली आहेत.
शिक्षण, साहित्य आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत कोकण मराठी साहित्य परिषदेने त्यांना श्री. बा. कारखानीस पुरस्कार जाहीर केला आहे. या सन्मानाबरोबरच त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त मालगुंड शिक्षण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्यांना शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक, हितचिंतक, सुनील मयेकर यांचे कुटुंबीय, नातेवाईक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.


