(रत्नागिरी / प्रतिनिधी)
समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास प्रशासनाची स्पष्ट मनाई असतानाही उत्साहाच्या भरात थेट किनाऱ्यावर गाडी नेऊन स्टंटबाजी करणे पुण्यातील पर्यटकांच्या चांगलेच अंगलट आले. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे-काजीरभाटी समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करताना पर्यटकांची गाडी वाळूत रुतली. भरतीचे पाणी वाढल्याने गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने आणि जेसीबीच्या सहाय्याने तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर गाडी बाहेर काढण्यात आली.
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहन नेण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. मात्र, या नियमाकडे दुर्लक्ष करून काही हौशी पर्यटक थेट समुद्रकिनाऱ्यावर वाहने नेऊन स्टंटबाजी करताना दिसत आहेत. दापोली तालुक्यात अशा प्रकारांना ऊत आलेला असतानाच आता रत्नागिरी तालुक्यातही या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. पुण्याहून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांनी शुक्रवारी नेवरे-काजीरभाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर थेट गाडी नेली. किनाऱ्यावर वाहन चालविताना त्यांची स्टंटबाजी सुरू असतानाच भरतीचे पाणी वाढले आणि गाडी वाळूत रुतली. गाडी बाहेर काढण्यासाठी पर्यटकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, प्रत्येक प्रयत्नानंतर गाडी आणखीच वाळूत फसत गेली.
पर्यटकांनी अखेर स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली. ग्रामस्थांच्या मदतीनेही गाडी बाहेर काढता न आल्याने जेसीबी बोलावण्यात आला. जेसीबीच्या सहाय्याने वाळू हटवत आणि योग्य पद्धतीने गाडी ओढत अखेर तिची सुटका करण्यात आली. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर गाडी किनाऱ्यावरून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर या पर्यटकांनी तेथून काढता पाय घेतला.
नियमांकडे दुर्लक्ष; अपघाताची शक्यता
समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेल्याने केवळ वाहन अडकण्याचा धोका नसून भरती-ओहोटीच्या बदलत्या स्थितीत पर्यटकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्यास वाहनासह पर्यटकही अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने वाहनांना समुद्रकिनाऱ्यावर प्रवेशास मनाई केली असताना पर्यटकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दापोलीनंतर आता रत्नागिरी तालुक्यातही समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेऊन स्टंटबाजीचे प्रकार वाढत असल्याने संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

