(रत्नागिरी)
जिल्ह्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने आणि छायाचित्रांचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. बनावट व्हॉट्सॲप खात्यांद्वारे नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असून, अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव व फोटो वापरून बनावट मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज पाठवत आहेत. “तातडीची गरज आहे” असे भासवून नागरिकांना बँक खात्यावर किंवा यु.पी.आय. (UPI) द्वारे पैसे पाठवण्यास सांगितले जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
▪️ अधिकृततेची खातरजमा करा: कोणताही प्रशासकीय अधिकारी वैयक्तिकरित्या किंवा अनोळखी क्रमांकावरून पैसे मागत नाही. असा मेसेज आल्यास खात्री करून घ्या.
▪️ संशयास्पद व्यवहार टाळा: अज्ञात क्रमांकावरून आलेल्या मेसेजमधील खात्यावर पैसे ट्रान्सफर करू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा.
▪️ गोपनीय माहिती सुरक्षित ठेवा: कोणत्याही संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका. वैयक्तिक किंवा कार्यालयीन माहिती शेअर करू नका.
▪️ तक्रार तात्काळ नोंदवा: अशा प्रकारची फसवणूक आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. तसेच सायबर सेलशी संपर्क साधा.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने येणाऱ्या अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहून आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

