( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार ( Dr Kanchan Madar ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कथित लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याच्या प्रकरणाला चार दिवस उलटले असतानाही जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे? संबंधित अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? अशी चर्चा आता आरोग्य विभागासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
एसीबीच्या कारवाईदरम्यान डॉ. मदार यांच्याकडून काही गोळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र संबंधित डॉक्टरांकडून गोळ्या सापडून प्रकरणाला चार दिवस उलटूनही याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, एवढ्या गंभीर घटनेनंतरही जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या डॉ. कुंबरे यांनाच जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांविषयी माहिती नसल्याचे सांगितले आहे. गोळ्यांसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी आता एसीबीकडे जिल्हा आरोग्य प्रशासन अधिकृत पत्रव्यवहार करणार असल्याचे डॉक्टर कुंबरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रचंड अँक्टिव असणाऱ्या डॉक्टर कांचन मदार यांच्याबद्दल कथित लाचखोरी आणि गर्भपाताशी संबंधित संवेदनशील प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र एवढ्या गंभीर घटनेनंतरही जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून अपेक्षित तत्परता दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून “माहिती मागविणार”, “पत्र पाठविणार”, “अहवाल मागविणार” अशा प्रतिक्रिया दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात जबाबदारी निश्चित करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली गेली आहेत, याचे उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही. विशेष म्हणजे, एसीबीने कारवाई केल्यानंतर चार-पाच दिवस उलटूनही जप्त करण्यात आलेल्या गोळ्या नेमक्या कोणत्या होत्या, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे समोर येत आहे ही बाब केवळ धक्कादायकच नाही तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
एखाद्या संवेदनशील प्रकरणात तातडीने चौकशी, नोंदींची पडताळणी आणि संबंधितांवर प्रशासकीय कारवाई अपेक्षित असताना केवळ पत्रव्यवहाराच्या फेऱ्यांमध्ये वेळ घालवला जात आहे का, असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रकरणाची व्याप्ती कमी दाखवून किंवा प्रक्रिया लांबवून ते शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आरोग्य व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकवायचा असेल तर केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही. या प्रकरणात नेमके काय घडले, जबाबदार कोण, आणि प्रशासनाने कोणती कारवाई केली, याचे स्पष्ट उत्तर जनतेला अपेक्षित आहे. अन्यथा “पत्रव्यवहाराचा खेळ” आणि “वेळकाढूपणा” अशा टीका अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दरम्यान, डॉ. मदार यांच्यावरील कारवाईबाबत विचारले असता निलंबनाचे अधिकार आयुक्तांकडे असल्याचे डॉ. कुंबरे यांनी स्पष्ट केले. मात्र एवढ्या गंभीर आरोपांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही कठोर प्रशासकीय भूमिका अद्याप दिसून न आल्याने संशय अधिकच बळावत आहे. “लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अटक झाल्यानंतर दोन दिवसांनी जामीन मिळाला असला, तरी अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नाही. त्यामुळे आरोग्य प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेत आहे? भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनंतरही कारवाईला विलंब का होत आहे? संबंधित अधिकाऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.” यातून सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असला तरी जिल्हा आरोग्य प्रशासनाची सावध आणि संथ भूमिका अनेक शंकांना जन्म देत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या नजरा केवळ ACB च्या तपासाकडे नसून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढील भूमिकेकडेही लागल्या आहेत. या प्रकरणात वस्तुस्थिती बाहेर येणार की प्रशासकीय पडदा टाकला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

