(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिरजोळे एमआयडीसी परिसरातील सीएनजी पंपावर अज्ञातांकडून कर्मचाऱ्यांना होत असलेली मारहाण, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे अखेर पंप व्यवस्थापनाने कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकारामुळे रत्नागिरीतील सीएनजी पुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहनधारक आणि पर्यटकांचीही मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
शहरानजीकच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या सीएनजी पंपावर गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या प्रचंड रांगा लागत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची संख्या वाढल्याने सीएनजीची मागणीही झपाट्याने वाढली आहे. परिणामी, पंपावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. अशातच काही अज्ञात व्यक्तींकडून पंपावर येऊन कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली जात असल्याचा गंभीर आरोप व्यवस्थापनाने केला आहे.
काही दिवसांपूर्वी पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. तसेच “ठार मारू” अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या दहशतीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंद केले असून, काहींनी नोकरीच सोडल्याचे समोर आले आहे. भीतीमुळे नवीन कर्मचारी काम स्वीकारण्यास तयार नसल्याने व्यवस्थापनापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
या पार्श्वभूमीवर, व्यवस्थापनाने १२ मेपासून पंपाचे कामकाज तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. नवीन कर्मचारी नेमणूक, सुरक्षा नियोजन आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेळ आवश्यक असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. अशा मारहाण धमक्यांच्या प्रकारावर पोलिसांनी केवळ औपचारिक गुन्हे दाखल करून थांबण्याऐवजी दहशत माजवणाऱ्यांवर कडक “हिंगा” दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी गुंडगिरी करणाऱ्यांना जर वेळीच कठोर कारवाईचा दणका बसला नाही, तर अशा प्रवृत्ती आणखी बळावण्याची भीती व्यक्त होते. विशेषतः सीएनजीसारखी अत्यावश्यक सेवा बंद पडणे म्हणजे त्याचा थेट फटका रिक्षाचालक, वाहनधारक, कोकणात येणारे पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे अशा घटनांकडे किरकोळ वाद म्हणून पाहण्याऐवजी पोलिसांनी ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २६ सीएनजी पंप कार्यरत असून, धामणी येथील केंद्रातून सर्व पंपांना गॅसचा पुरवठा केला जातो. पूर्वी जिल्ह्यासाठी दररोज सुमारे ६० हजार किलो सीएनजी पुरवठा होत होता. मात्र वाढती पर्यटक संख्या आणि वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पुरवठा विभागाने अतिरिक्त १० हजार किलो क्षमतेची वाढ केली आहे. तरीदेखील वाढत्या मागणीमुळे पुरवठा अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सीएनजी पंप बंद राहिल्याने शहरातील रिक्षाचालक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, खासगी वाहनधारक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.
दहशत माजवणाऱ्यांची एवढी हिंमत वाढतेच कशी?
अत्यावश्यक सेवेशी संबंधित सीएनजी एका पंपावर कर्मचाऱ्यांना उघडपणे मारहाण होते, ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, कर्मचारी भीतीपोटी नोकऱ्या सोडतात आणि अखेर संपूर्ण पंप बंद ठेवण्याची वेळ येते; मात्र या सर्व प्रकारात पोलिसांची भूमिका नेमकी काय होती, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करणारे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण करणारे लोक इतके बेधडक कसे झाले?दहशत माजवणाऱ्यांची एवढी हिंमत वाढतेच कशी? त्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही का? वारंवार घडणाऱ्या घटनांनंतरही पोलिसांनी ठोस प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही? अशा प्रश्नांनी आता जोर धरला आहे.

