(रत्नागिरी / वार्ताहर)
भारतीय वास्तुविशारद संस्था (आयआयए) रत्नसिंधु रत्नागिरी-सिंधुदुर्ग सबसेंटरच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच विवा एक्झिक्युटीव्ह येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कोकणातील पहिले आयआयए फेलो म्हणून आर्किटेक्ट संतोष तावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मकरंद केसरकर (रत्नागिरी), उपाध्यक्षपदी गौरी सामंत (वेंगुर्ला), कोषाध्यक्षपदी संजना शेटे (रत्नागिरी) आणि सचिवपदी श्रेया इंदुलकर (रत्नागिरी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्किटेक्ट संतोष तावडे यांची सल्लागार म्हणून, तर निलेश गुंदेचा, प्रियदर्शन कोपरकर, अपूर्वा मोहिते आणि हर्षद सरवणकर यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच मेघा पंडित बारटक्के (दापोली) आणि शलिन कापडी (संगमेश्वर) यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली. इतर सदस्यांचीही फेरनियुक्ती करण्यात आली.
या कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२६ ते २०२८ असा दोन वर्षांचा आहे. या कालावधीत विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ‘आर्किटेक्ट फॉर लाईफ’ या उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत रविवारी (ता. १८) सकाळी १० वाजता लायन्स आय केअर हॉस्पीटल, एमआयडीसी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय ऑनलाइन वेबिनारचेही आयोजन करण्यात आले आहे.


