(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रमोद जठार यांनी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदार विकास गंबरे यांच्याकडून तालुक्यातील पाणी उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तालुक्याचा सविस्तर पाणीटंचाई आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना आमदार जठार यांनी प्रशासनाला दिल्या.
उपलब्ध धरणांमधील पाण्याचा काटेकोरपणे आणि योग्य नियोजन करून वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संभाव्य पाणीटंचाईच्या काळात विंधन विहिरी, धरणांचे कालवे आणि अन्य उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावीपणे उपयोग कसा करता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक गावातील पाण्याची गरज आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर आमदार जठार यांनी भर दिला.
“हा निसर्गाचा कोप आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एकजुटीने सामोरे जाण्याची गरज आहे. दुष्काळाच्या प्रश्नात राजकारण किंवा पक्ष आणू नका. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी केले.
दरम्यान, भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा, नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राजापूर तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे, पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे आणि गरज असलेल्या ठिकाणी पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीला राजापूरचे उपसभापती अभिजित गुरव, राजापूर पूर्व मंडल अध्यक्ष एकनाथ मोंडे, राजापूर पश्चिम मंडल अध्यक्ष मोहन घुमे, सरचिटणीस अमोल सिनकर, सुरेश गुरव, फारुख साखरकर, प्रल्हाद तावडे, चंद्रकांत लिंगायत, काशिनाथ पाटील, संतोष धुरत, भूषण सावंत, अजय लाड, राजापूरच्या नगरसेविका सुयोगा जठार, पटेल मॅडम, मारुती कांबळे, सुधा चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


