(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल आठ वर्षांनंतर राजापूर येथील मंगल कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत तालुक्यातील विविध प्रशासकीय कामांबाबतच्या तक्रारी आणि समस्या मांडल्या. यावेळी अनेक तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.
या आमसभेला आमदार किरण सामंत यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, उपविभागीय अधिकारी विश्वजित गाताडे, तहसीलदार विकास गमरे, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल बनसोड, सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव उपस्थित होते.
तसेच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, विकास संस्थांचे पदाधिकारी, अन्य प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी या आमसभेत सहभाग घेतला.
राजापूर तालुक्यातील विविध प्रशासकीय कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या नागरिकांनी यावेळी आपल्या तक्रारी आणि अडचणी मांडल्या. संबंधित विषयांवर सुनावणी घेण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही आमसभा दुपारी १.३० वाजेपर्यंत चालली. जवळपास अडीच तासांत सभेचे कामकाज पूर्ण झाले.
दरम्यान, आमदार भैया सामंत यांनी केवळ विकासकामांपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या शंभर टक्के मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले, अशी भावना उपस्थित नागरिकांमधून व्यक्त होत होती. तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या या आमसभेमुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली.


