(रत्नागिरी / राजापूर)
राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी घडलेल्या एका नाट्यमय घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मुंबईहून आलेल्या एका प्रवाशाने रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहताच धूम ठोकली आणि जवळच असलेल्या एका घरात घुसून दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर घरातील कोयता आणि घण हातात घेत घरातील व्यक्तींना धमकावत तब्बल काही तास परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले. अखेर संतप्त ग्रामस्थांनी घराचा मागील दरवाजा फोडून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही घटना १ जुलै रोजी सायंकाळी राजापूर रोड रेल्वे स्थानकालगतच्या फणसवाडी येथे घडली. या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून मांडवी एक्स्प्रेसने आलेला एक प्रवासी राजापूर रोड स्थानकावर उतरला. मात्र, स्थानकाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहताच तो घाबरल्यासारखा पळत सुटला आणि जवळच असलेल्या प्रकाश श्रृंगारे यांच्या घरात शिरला. त्यावेळी घरात केवळ श्रृंगारे यांची वृद्ध आई उपस्थित होती, तर इतर सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते.
घरात प्रवेश करताच त्या व्यक्तीने दरवाजा आतून बंद करून घेतला. घरात असलेला कोयता आणि घण हातात घेत त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच प्रकाश श्रृंगारे आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित व्यक्तीने दरवाजा उघडण्यास नकार दिला. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत प्रभुदेसाई यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी रेल्वे पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत संबंधिताशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजापूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वारंवार शरण येण्याचे आवाहन केले; मात्र संबंधित व्यक्ती कोणालाही प्रतिसाद देत नव्हती.
या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. परिस्थिती अधिकच तणावपूर्ण होत असताना काही धाडसी ग्रामस्थांनी घराचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. यावेळी संतप्त जमावाने त्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली. जखमी अवस्थेत त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा प्रवासी नेमका कोण आहे, पोलिसांना पाहून तो का पळाला, त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का, तो कोणत्या कारणामुळे एवढा घाबरला होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनीही या घटनेबाबत कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी वेळेवर ठोस आणि प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संशयिताला पोलिसांच्या वाहनाऐवजी रिक्षामधून पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचीही परिसरात चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित व्यक्तीचा जबाब नोंदवल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणामागील सत्य उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

