(राजापूर)
मुबलक पाऊस पडूनही दरवर्षी तीव्र पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या राजापूर तालुक्याला टंचाईमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने तालुक्याचा टँकरमुक्त संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. गेल्या दशकभरामध्ये पहिल्यांदा असा आराखडा तयार केला गेला असून, त्यामध्ये टँकरग्रस्त गावांना पाणीटंचाईच्या काळामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी विहीर खोदणे, नळपाणीपुरवठा योजना दुरुस्ती, विहिरीतील गाळ उपसा वा दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी दिली.
राजापूर तालुक्याचा तब्बल १ कोटी २ लाख ६० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या ६३ कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नळपाणी योजना, विहिरी, विंधन विहिरींच्या दुरुस्तीसोबतच १७ गावे आणि ५० वाड्यांमधील विहीर खोदाईची ५७ लाख ६० हजार रुपयांच्या सर्वाधिक ४८ कामांचा समावेश आहे.
पाणीटंचाई आराखडा बैठकीत आमदार सामंत यांनी टैंकरमुक्त तालुका करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये विविध स्वरूपाच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.