(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यात प्रबोधनात्मक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यासह नवोदित कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या धम्मक्रांती कला मंच, तालुका रत्नागिरी या संघटनेची विशेष सभा शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जाकादेवी खालगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष रविकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.
संघटनेचे कार्यकारी मंडळ आणि गाव प्रतिनिधींच्या तालुकास्तरीय या सभेत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन, त्यावर चर्चा आणि मंजुरी घेण्यात येणार आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२६ रोजीचा जमाखर्च सभेसमोर मांडण्यात येईल. निधी संकलनाबाबत विचारविनिमय करण्याबरोबरच आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करून त्यांचे संभाव्य नियोजन केले जाणार आहे. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवरही चर्चा होणार आहे.
या विशेष सभेला धम्मक्रांती कला मंचाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रविकांत पवार आणि चिटणीस सतीश कदम यांनी केले आहे.


