(रत्नागिरी / वार्ताहर)
नवरात्रीचे औचित्य साधून अनाम प्रेम परिवाराच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथील अधिसेविका आणि परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. सौ. स्वरूपा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आरोग्य क्षेत्रात समर्पित भावनेने रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांचा गौरव करण्यात आला. तसेच जिभेच्या आणि थायरॉईडच्या कर्करोगाशी जिद्दीने सामना करणाऱ्या ५८ वर्षीय श्रीमती सुनीता केशव पवार यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या संघर्षमय प्रवासाला आणि जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम करण्यात आला.
कर्करोगाशी लढा; माणुसकीच्या आधाराने मिळतेय बळ
सुनीता केशव पवार या सन २०२४ पासून जिभेच्या आणि थायरॉईडच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. या काळात त्यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टाटा हॉस्पिटल, खारघर येथे उपचार सुरू असतानाही त्यांनी जगण्याची उमेद कायम ठेवली आहे.
या संघर्षाच्या काळात श्री. दिनकर कांबळे यांनी माणुसकीच्या भावनेतून त्यांना मोलाचे सहकार्य केले. रत्नागिरीहून मुंबईला उपचारांसाठी जाण्यापासून ते उपचारांची व्यवस्था करण्यापर्यंत त्यांनी मदतीचा हात दिला. त्यानंतर सन २०२५ मध्ये सुनीता पवार जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आल्या असताना, त्यांना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात मदतीसाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला.
या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आवश्यक मदत मिळेल, असा विश्वास त्यांना देण्यात आला. गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत या कार्यालयाकडून त्यांना वेळोवेळी मदत आणि आधार मिळत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी सामना करताना औषधोपचारांइतकीच मानसिक उभारी आणि आपुलकीची साथही महत्त्वाची असते. सुनीता पवार यांच्या संघर्षात मिळालेला हा आधार त्यांच्या जगण्याच्या आशेला बळ देणारा ठरत आहे. त्यांच्या जिद्दीची दखल घेत अनाम प्रेम परिवाराने त्यांचा विशेष गौरव केला.
रुग्णसेवेतील योगदानाबद्दल परिचारिकांचा गौरव
रुग्णांची काळजी घेणे, उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणे आणि रुग्णांना मानसिक आधार देणे, अशा विविध जबाबदाऱ्या परिचारिका सातत्याने पार पाडतात. आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेल्या या सेविकांच्या कार्याची दखल घेत कार्यक्रमात अधिसेविका श्रीम. शिल्पा घाटगे, प्राचार्या नर्सिंग स्कूल श्रीम. श्रृती आंबेकर, PHN श्रीम. माया सावंत, श्रीम. श्रृती जाधव, श्रीम. निलम मयेकर, परिपाठ्यनिर्देशिका श्रीम. मिनाक्षी दळवी, श्रीम. मेदीनी तांबे, परिसेविका श्रीम. संध्या सप्रे, वेशाली पवार, तन्वी रामपुरकर, अधिपरिचारिका श्रीम. निधी पेडणेकर, प्राजक्ता जाक्कर, वर्षा डिचोलकर आणि सुचिता पांचाळ यांचा सन्मान करण्यात आला.
‘आपण ज्या समाजात वावरतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो,’ या भावनेतून अनाम प्रेम परिवार विविध समाजोपयोगी उपक्रम राबवतो. सामाजिक बांधिलकी जपत गरजू व्यक्तींना मदतीचा आधार देणे, समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करणे आणि माणुसकीची भावना जिवंत ठेवणे, हा या उपक्रमांमागील मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला सौ. स्वरूपा सामंत, डॉ. जिज्ञासा भाट्ये, डॉ. अंकुश शिरसाट, डॉ. ज्ञानेश व्हीटेकर, ज्योती गराटे, सुचेता पाटील, समीक्षा कामत, भाग्यश्री सिनकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. हर्षदा गावडे, सौ. श्रद्धा मोरे, पंचायत समिती सदस्य सौ. विद्या बोंबले, डॉ. पद्मजा कांबळे, नगरसेवक सोहेल मुकादम, मेट्रन सौ. शिल्पा घाटगे, शहर विभागप्रमुख मनोज साळवी, आरोग्य सल्लागार सनियंत्रण समितीचे सदस्य अभिजीत दुड्ये, सौ. संपदा तळेकर, श्री. सागर भिंगारे, युवासेनेचे अथांग कदम आणि युवराज शेट्ये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रथमेश साळवी यांनी केले.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात परिचारिकांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान करण्यासोबतच कर्करोगाशी झुंज देणाऱ्या सुनीता पवार यांच्या जिद्दीचा गौरव करण्यात आला. संकटाच्या काळात गरजू व्यक्तींच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदतीचा आणि आपुलकीचा आधार देण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले.


