(रत्नागिरी)
किल्ल्यांवरील अनुचित वर्तनाला चोख प्रत्युत्तर देत नववर्षाचा स्वागत सोहळा गडांच्या संरक्षणासाठी समर्पित करून शिवप्रेमींनी नवा आदर्श निर्माण केला. जिल्ह्यातील ऐतिहासिक रत्नदुर्ग (भगवती किल्ला), जयगड आणि पूर्णगड या किल्ल्यांवर 31 डिसेंबरच्या निमित्ताने गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.
गेल्या काही वर्षांत रत्नदुर्ग हा तळीरामांसाठी आणि प्रेमीयुगुलांसाठी सुरक्षित स्थळ मानला जाऊ लागला होता, जेथे अनेक गैरप्रकार वारंवार नजरेस येत होते. किल्ल्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला ओळखून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागाने खडा पहारा देण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या सदस्यांनी आणि रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने रात्रभर किल्ल्यावर कडक पहारा ठेवला गेला. अनुचित प्रकार करणाऱ्या तळीरामांना किल्ल्यावरून हाकलून लावण्यात आले, तसेच काही ठिकाणी कडक कारवाईही करण्यात आली.
जिल्हाभरातून असंख्य शिवभक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या साक्षीने रत्नागिरी पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रत्नदुर्ग, किल्ले जयगड आणि किल्ले पूर्णगड या किल्ल्यांवर हि मोहीम पार पडली. मोहीम राबवत असताना अनेक उपद्रवी, मद्यपी तसेच अश्लील चाळे करणाऱ्यांना प्रतिबंधित करण्यात आले, तसेच गडकिल्ल्यांचे महत्व पटवून देण्याचे कार्य करण्यात आले.
रत्नागिरी मधील महिलांनी देखील यामध्ये सहभाग नोंदविला.
यामध्ये गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दिपेश वारंग, रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्ष मानसी चव्हाण, रणरागिणी स्नेहल बने, भूमिका चंदरकर, संपर्क प्रमुख तन्मय जाधव तसेच गडकिल्ले सेवक सचिन देशमुख,आकाश जोगळेकर , रोहित नांदगावकर, शुभम आग्रे,अंकुर मांडवकर, सौरव बळकटे, प्रितम मांडवकर, सुजल सोळंके, सुरज खोचाडे, श्रीरंग सनगरे, मयूर भितळे, ओंकार बाणे, करण सुपल, श्रीकांत कदम या मावळ्यांचा सहभाग होता.
तसेच सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर व सहकारी श्वेता फाळके, गीता शिंदे, आरती सावंत, धनश्री कुष्टे, गौरी कुष्टे, संचीता कदम, संजय कदम सर, समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था कोकण प्रांत अध्यक्ष श्रीकांत मराठे यांनी रात्रभर खडा पहारा देऊन आपले मोलाचे योगदान दिले.
पोलिसांची अनमोल साथ
रत्नागिरी पोलिसांचे या मोहिमेला प्रचंड सहकार्य लाभले. रात्रभर पोलिसांचा किल्ल्यावर बंदोबस्त होता, ज्यामुळे मोहिम अधिक यशस्वी ठरली. पोलिस आणि प्रतिष्ठानच्या एकत्रित प्रयत्नांमुळे किल्ल्यावर घडणारे अनुचित प्रकार थांबवण्यात यश मिळाले.
रत्नदुर्ग संवर्धनाची नवी दिशा
या मोहिमेने रत्नदुर्ग किल्ल्यावर अनुचित वर्तन थांबवण्याचा स्पष्ट संदेश दिला. गड-किल्ल्यांच्या संरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले. आगामी काळात किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अधिक कठोर उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. गड-किल्ल्यांच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.