( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
राजापूर तालुक्यातील नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर बेपत्ता असलेल्या मायरा जुनेद भाटकर हिचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून विविध यंत्रणांशी समन्वय साधला आहे. कोस्टगार्डचे कमांडो, हेलिकॉप्टर, पोलीस नौका विभाग, कायकिंग बोट आणि मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथकाच्या मदतीने खाडीपात्रात शोध सुरू आहे.
११ ऑक्टोबर रोजी नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या भाटकर कुटुंबावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत बुशरा जुनेद भाटकर, मोहम्मद जुनेद भाटकर आणि जुवेरिया जुनेद भाटकर या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत पाण्यात बुडालेली मायरा जुनेद भाटकर अद्याप मिळून आलेली नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. केवळ घटनास्थळाची पाहणी करून न थांबता त्यांनी स्वतः बोटीतून खाडीपात्रात जाऊन शोधमोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर बेपत्ता मुलीचा शोध अधिक व्यापक स्वरूपात घेण्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेण्यात आली. सध्या बगाटे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली शोधकार्य व्यापक पध्दतीने सुरू असून, उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करून मुलीचा शोध घेण्यावर भर देण्यात येत आहे.
या मोहिमेत लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, नाटे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाटे पोलीस ठाण्यातील दहा पोलीस अंमलदार, सागरी सुरक्षा विभागाचे दहा होमगार्ड, रत्नागिरी पोलीस नौका विभागाचे जवान तसेच मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथक सहभागी झाले आहे. कोस्टगार्डच्या कमांडोंची आणि हेलिकॉप्टरची मदतही घेतली जात आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून खाडीपात्र आणि परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर नातेवाइकांचा सवाल
तीन बालकांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असतानाच मायरा अद्याप बेपत्ता असल्याने कुटुंबीयांच्या प्रतीक्षेची वेदना अधिक तीव्र झाली आहे. एका दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, बेपत्ता मायराच्या शोधासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार पोलीस दल रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. अशा वेळी महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अद्याप कुटुंबीयांच्या भेटीसाठी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या उदासीनतेमुळे नातेवाइकांचा संताप अनावर झाला असून, प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘एखाद्या मंत्र्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या मुला-मुलीवर अशी वेळ आली असती, तर प्रशासन इतकेच सुस्त राहिले असते का?’ असा बोचरा सवाल उपस्थित करत त्यांनी व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
एसपी नितीन बगाटे मात्र शोधमोहिमेसाठी दिवस-रात्र ठाण मांडून
एकीकडे प्रशासनाच्या प्रतिसादाबाबत नातेवाइकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असताना, दुसरीकडे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मायराच्या शोधासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार आणि विविध शोधपथकांना सोबत घेत खाडीपात्रात शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बगाटे यांनी स्वतः बोटीतून शोधमोहिमेत सहभाग घेतला असून, विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधत शोधकार्याला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर नातेवाइकांनी व्यक्त केलेली नाराजी आणि मायराच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सुरू ठेवलेले प्रयत्न, या दोन बाबींमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.


