(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त 1 मे रोजी रत्नागिरी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडणार आहे. सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी 23 एप्रिल 2026 च्या शासन निर्णयानुसार कार्यक्रमाचे नियोजन स्पष्ट केले. नगरपालिकेकडून पाणीपुरवठा, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून रुग्णवाहिका, क्रीडा विभागाकडून ध्वनी व्यवस्था आणि महावितरणकडून अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी स्पष्ट केले की, मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे होणार असल्याने जिल्ह्यातील इतर कोणत्याही शासकीय किंवा अर्धशासकीय कार्यालयांनी सकाळी 7.15 ते 9 या वेळेत ध्वजवंदन किंवा अन्य कार्यक्रम आयोजित करू नयेत. स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास तो सकाळी 7.15 पूर्वी किंवा 9 नंतर घ्यावा.
कार्यक्रमाच्या शिस्तीबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. सावधान स्थितीत ‘वंदे मातरम्’ सादर केल्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करत राष्ट्रगीत वाजविण्यात येईल. त्यानंतर तत्काळ राज्यगीत वाजविण्यात येणार आहे. या सूचनांची माहिती ग्रामीण भाग, शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी, असेही निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्र दिनाचा सोहळा सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

