(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
गेल्या तीन ते चार दिवसांपासून शिक्षकांची समजूत काढून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या मंगेश चिवटे यांच्यासारखाच शिक्षक प्रतिनिधी मिळावा, या भूमिकेवर शिक्षक ठाम असल्याचे आडसुळ यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठीच संघटनेने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांचे प्रश्न आणि न्याय्य मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रभावी प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे मत आडसुळ यांनी व्यक्त केले. शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना, शाळांसाठी टप्पावाढ योजना, कॅशलेस योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी मंगेश चिवटे यांच्यासारखा प्रतिनिधी आवश्यक होता, असे त्यांनी नमूद केले. शिक्षकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १० हजार ५०० नोंदणीकृत शिक्षक सभासद आहेत. या सर्व शिक्षक मतदारांनी मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची भूमिका घेतल्याने आगामी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत संघटनेच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय व्हावेत, यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांनी व्यक्त केला.


