( मुंबई )
राज्यात शिक्षक भरती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षण सुधारणा याबाबत सातत्याने घोषणा होत असल्या, तरी दुर्गम भागातील शाळांचे वास्तव अद्याप बदललेले नसल्याचे समोर आले आहे. UDISE Plus 2025-26 च्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, राज्यात तब्बल 9,274 एकशिक्षकी शाळा असून त्यामध्ये 1 लाख 79 हजार 71 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्हा 739 एकशिक्षकी शाळांसह राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
जिल्हानिहाय आकडेवारीतून राज्यातील एकशिक्षकी शाळांचे असमतोल चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील एकूण 9,274 एकशिक्षकी शाळांपैकी 4,580 शाळा केवळ आठ जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत. यामध्ये रत्नागिरी, रायगड, यवतमाळ, नागपूर, सातारा, पालघर, गडचिरोली आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
एका शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी
एकशिक्षकी शाळांमध्ये केवळ अध्यापनच नव्हे, तर मुख्याध्यापकांची जबाबदारी, प्रशासकीय कामकाज, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, ऑनलाइन माहिती भरणे, शालेय नोंदी, पालकांशी समन्वय आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या एका शिक्षकालाच पार पाडाव्या लागतात. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एका शिक्षकावर एवढा मोठा कामाचा भार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वाढते.
एका वर्षात 1,122 शाळांची वाढ
UDISE Plus च्या आकडेवारीनुसार, 2024-25 मध्ये राज्यात 8,152 एकशिक्षकी शाळा होत्या. मात्र, अवघ्या एका वर्षात त्यामध्ये 1,122 शाळांची भर पडून ही संख्या 9,274 वर पोहोचली आहे. यावरून शिक्षक भरती, रिक्त पदे आणि दुर्गम भागातील मनुष्यबळ नियोजनाची समस्या अद्याप गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी राज्यात अव्वल
एकशिक्षकी शाळांच्या संख्येनुसार राज्यातील प्रमुख जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत.
| जिल्हा | एकशिक्षकी शाळा |
|---|---|
| रत्नागिरी | 739 |
| रायगड | 637 |
| यवतमाळ | 585 |
| नागपूर | 531 |
| सातारा | 530 |
| पालघर | 528 |
| गडचिरोली | 526 |
| पुणे | 504 |
राज्यात 500 पेक्षा अधिक एकशिक्षकी शाळा असलेल्या आठ जिल्ह्यांपैकी तीन कोकणातील, तीन विदर्भातील आणि दोन पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. यावरून डोंगराळ, आदिवासी आणि विखुरलेल्या वस्तीच्या भागांमध्ये शिक्षकांची कमतरता अधिक तीव्र असल्याचे दिसून येते.
या जिल्ह्यांमध्ये संख्या तुलनेने कमी
दुसरीकडे, हिंगोली (25), लातूर (47), अकोला (51), परभणी (52), धाराशिव (57), मुंबई शहर (57), वाशीम (63) आणि बीड (65) या जिल्ह्यांमध्ये एकशिक्षकी शाळांची संख्या तुलनेने कमी आहे. तथापि, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मिळून 170 एकशिक्षकी शाळा असल्याची नोंदही या अहवालात करण्यात आली आहे. त्यामुळे ही समस्या केवळ ग्रामीण किंवा आदिवासी भागापुरती मर्यादित नसून महानगरांमध्येही अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होते.
शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान
एकशिक्षकी शाळांची वाढती संख्या राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय मानली जात आहे. शिक्षक भरती वेगाने करणे, दुर्गम भागात शिक्षकांची उपलब्धता वाढवणे आणि मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन करणे ही काळाची गरज असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

