पुण्यातील गोळीबाराच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच मुंबईतही गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी (२५ नोव्हेंबर) रात्री माटुंगा परिसरातील शोभा हॉटेलजवळ असलेल्या पी.सी. जैन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानाला अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले. रात्री साधारण ७.३० वाजण्याच्या सुमारास दुकानावर ५ ते ६ राऊंड गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांनी एकापाठोपाठ पाच ते सहा गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. माटुंग्यासारख्या वर्दळीच्या भागात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, याचा तपास सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांनी दुकानालाच लक्ष्य का केले आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.
हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची शक्यता आहे. तसेच या गोळीबारामागे व्यावसायिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा अन्य काही कारण आहे का, या दिशेनेही तपास केला जाणार आहे.
दरम्यान, या गोळीबारात कोणी जखमी झाले आहे का, तसेच दुकानाचे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हल्लेखोरांचा उद्देशही अद्याप समजू शकलेला नाही. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेचे अधिक तपशील स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील गजबजलेल्या माटुंगा परिसरात सोन्याच्या दुकानावर भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


