(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) १८ व्या मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला असून, या संमेलनाच्या नियोजनासाठी बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुलात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता होणाऱ्या या सभेच्या निमित्ताने संमेलनाच्या लोगो व ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी होणार आहे.
कोमसापचे १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध नियोजनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण साबणे आणि रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, रत्नागिरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल आणि मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता खेऊर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
विशेष नियोजन सभेत केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या हस्ते वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाच्या लोगो व ध्वजाच्या अनावरणामुळे आगामी संमेलनाच्या तयारीला अधिक गती मिळणार आहे.
या विशेष सभेला कोमसापच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीसह रत्नागिरी, मालगुंड, लांजा, राजापूर, देवरूख, गुहागर, चिपळूण, खेड आणि दापोली येथील शाखांच्या कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १८ व्या मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि विविध समित्यांच्या सदस्यांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, कार्यवाह गजानन पाटील, कोमसापचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद शेलार आणि जिल्हा सचिव मुश्ताक खान यांनी हे आवाहन केले आहे.


