(रत्नागिरी / प्रतिनिधी)
खेडशी येथील लक्ष्मी-नारायण नगर परिसरातील बंद बंगल्याला चोरट्याने लक्ष्य करत दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पितळी व तांब्याच्या भांड्यांसह बाथरूममधील मिक्सर, नळ, कपडे आणि चार्जिंग बॅटरी असा सुमारे २१ हजार ४०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२० वाजल्यापासून १० सप्टेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त विनोद गणपत विचारे (वय ६२) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विचारे यांच्या मालकीचा कृष्णकुंज बंगला लक्ष्मी-नारायण नगर, खेडशी येथे आहे. सध्या ते मुंबईतील डोंबिवली पश्चिम येथे वास्तव्यास असल्याने बंगला बंद होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने बंगल्याच्या पुढील दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील वस्तू लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चोरट्याने २०० रुपयांची चार्जिंग बॅटरी, सुमारे २ हजार रुपयांचे पितळी साहित्य ज्यामध्ये एक समई व सात मोठी पितळी भांडी, तसेच ९ हजार २०० रुपयांची तांब्याची भांडी असा ऐवज लंपास केला. तांब्याच्या साहित्यामध्ये तीन तांबे, दोन ताम्हाणे, एक पेला आणि एक पळीपात्राचा समावेश आहे. याशिवाय ५०० रुपयांचा अल्युमिनियमचा डबा, ७ हजार रुपयांचे बाथरूममधील दोन मिक्सर व तीन नळ आणि २ हजार ५०० रुपयांचे घरातील वापरते कपडे व आठ साड्या चोरीला गेल्या आहेत. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत २१ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


