(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर तालुका काजू प्रक्रिया धारक संघटनेची बैठक १२ तारखेला देवरूख येथील यशराज काजू फॅक्टरीमध्ये उत्साहात पार पडली. या बैठकीला तालुक्यातील सुमारे २० काजू उद्योजक उपस्थित होते. काजू प्रक्रिया उद्योगांच्या समस्या, शासकीय योजनांचा लाभ आणि कारखानदारांच्या अडचणी यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रिया धारक संघटनेचे नूतन अध्यक्ष विवेकशेठ बारगीर आणि सदस्य तौफिक उपस्थित होते. संगमेश्वर तालुका संघटनेच्या वतीने संदीप टिळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन विवेक बारगीर यांचे स्वागत केले, तर प्रकाश करंडे यांनी तौफिक यांचे स्वागत केले. जिल्हास्तरीय संघटनेच्या कामकाजाची तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती विवेक बारगीर यांनी उपस्थितांना दिली.
तालुक्यातील प्रत्येक काजू प्रक्रिया धारकाने आपल्या अडचणी आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटित होणे आवश्यक असल्याचे विवेक बारगीर यांनी सांगितले. अधिकाधिक कारखानदारांनी संघटनेत नावनोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ लहान-मोठ्या सर्व काजू प्रक्रिया कारखानदारांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले.
आमदार किरण (भैय्या) सामंत हे यापुढे संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच रत्नागिरी येथे कृषी विभाग, महाराष्ट्र पणन महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र काजू बोर्ड तसेच काजू प्रक्रिया प्रकल्पांशी संबंधित प्रमुख अधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रिया धारक संघटनेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश चाळके यांनी दिली.
बैठक यशस्वी करण्यासाठी सुनीता पाटील आणि संदीप टिळेकर यांनी प्रयत्न केले. प्रकाश करंडे यांनी काजू कारखानदारांच्या विविध समस्या आणि व्यथा मांडल्या. बँक स्तरावर कारखानदारांना भेडसावणाऱ्या अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले.
बैठकीतील चर्चेदरम्यान काजू बोर्डाच्या माध्यमातून तालुकास्तरावर गोदामाची व्यवस्था करून काजू बीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील काजू प्रक्रिया कारखाने किमान १० महिने सुरू ठेवणे शक्य होईल, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.
तालुक्यातील काजू प्रक्रिया उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि संघटनेचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व काजू प्रक्रिया धारकांनी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.


