(विशेष/ प्रतिनिधी)
एखादा वरिष्ठ अधिकारी म्हणजे वातानुकूलित कार्यालय, बैठका आणि फाईल्सच्या चौकटीत अडकलेली प्रतिमा अनेकांच्या मनात असते. मात्र रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक IPS नितीन बगाटे यांनी ही प्रतिमा वारंवार मोडीत काढली आहे. खाकीचा रुबाब जपत माणुसकीची ऊब जपणारे बगाटे पुन्हा एकदा चिखलात उतरले आणि शेतकऱ्यांच्या श्रमाला सलाम करत त्यांनी स्वतः भातलावणीत सहभाग घेतला.
मुंबई-गोवा महामार्ग आणि मिऱ्या-नागपूर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबावी, निष्पाप जीव वाचावेत, यासाठी सातत्याने महामार्गांची पाहणी करणारे आणि अधीनस्थ अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणारे नितीन बगाटे हे संगमेश्वर दौऱ्यावर होते. त्याचवेळी मानसकोंड परिसरात पावसात भातलावणी करणारे शेतकरी कुटुंब त्यांच्या नजरेस पडले. पुढचा क्षण मात्र उपस्थितांसाठी अनपेक्षित होता. आपले वाहन थांबवले… जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्वतः खाली उतरले… खाकी वर्दीला चिखल लागेल, बूट मातीने माखतील किंवा पाय चिखलात रुततील, याची कोणतीही पर्वा न करता त्यांनी थेट शेताचा रस्ता धरला. पँट गुडघ्यापर्यंत वर घेत त्यांनी शेतकरी कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि काही क्षणांतच ते स्वतः भाताची रोपे हातात घेऊन शेतकऱ्यांसोबत भातलावणी करताना दिसले. ही केवळ औपचारिक भेट नव्हती; ती कोकणच्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमांप्रती व्यक्त झालेली खरी कृतज्ञता होती. जमिनीशी नाळ जोडलेली माणसं समजून घेण्यासाठी कार्यालयातील खुर्ची पुरेशी नसते, तर मातीत उतरून त्यांच्या भावना जाणून घ्याव्या लागतात, याची जाणीव बगाटे यांच्या कृतीतून प्रकर्षाने दिसून आली.
आयपीएस नितीन बगाटे यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव नव्हता. गेल्या पावसाळ्यात निवळी येथे झालेल्या नांगरणी स्पर्धेत त्यांनी बैलांची दोरी हातात घेत चिखलातून धावत सर्वांचे लक्ष वेधले होते. यंदा पुन्हा शेतकऱ्यांसोबत भातलावणीत सहभागी होत त्यांनी खाकीचा संवेदनशील चेहरा अधिक ठळक केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रुजू झाल्यापासून बगाटे यांनी केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. वाहतूक सुरक्षेला प्राधान्य, अपघात नियंत्रणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, जनजागृती उपक्रम, समाजातील विविध घटकांशी थेट संवाद आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन उभारण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून येतो.
जिल्ह्यातील सर्व समाजघटकांच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते सहजतेने सहभागी होतात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेत असतानाच कायद्याच्या चौकटीत प्रत्येकाला न्याय मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी ते तितक्याच संवेदनशीलतेने काम करत असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करतात. खाकी वर्दीचा खरा सन्मान केवळ अधिकारात नसून लोकांच्या विश्वासात असतो. चिखलात उतरून शेतकऱ्यांच्या श्रमात सहभागी झालेले IPS नितीन बगाटे यांचे हे चित्र त्या विश्वासाला अधिक बळ देणारे ठरले आहे. पदाची उंची जपत माणुसकीची उब कायम ठेवणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळेच प्रशासन आणि समाज यांच्यातील नातं अधिक दृढ होत असल्याची भावना या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

