(राजापूर / तुषार पाचलकर)
“आजच्या युगात विद्यार्थ्यांनी स्मार्ट मोबाईलप्रमाणे स्मार्ट बनून विविध कौशल्ये आत्मसात करावीत,” असे आवाहन टेन स्टोन सोशल इन्स्टिट्यूड, पुणेचे सचिव राजेंद्र बहाळकर यांनी केले. कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय, पाचल यांच्या वतीने सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर नारकर होते. व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष राजन लब्दे, खजिनदार शिरीष सक्रे, विश्वस्त श्रीकृष्ण सुतार, विंदा साखळकर, सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या मुख्याध्यापिका श्रीमती खरात, पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक सक्रे, प्रा. स्नेहल नेने, डॉ. सुनील नेने आणि नवोदित साहित्यिक नितीश खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी नाईकवाडे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मार्गदर्शन करताना राजेंद्र बहाळकर यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये शिकण्यावर भर द्यावा, असे सांगितले. व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुणांची जोपासना आणि विविध विषयांचे ज्ञान मिळवणे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे. त्याचबरोबर चांगल्या पुस्तकांचे नियमित वाचन करावे, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी गाणी आणि खेळांच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली आणि विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वाचनालयाचे कार्यवाह विनायक खानविलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी वाचनालयाचे ग्रंथपाल विठोबा चव्हाण, लिपिक काव्या सुतार, सरस्वती विद्यामंदिरचे सुमारे ३०० विद्यार्थी, शिक्षक, वाचक आणि सभासद उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर वाचनालयाच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


