(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीच्या लेबर कॉलनीमध्ये एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामगार वर्गात शोककळा पसरली आहे.
ही घटना शुक्रवार, १६ जानेवारी रोजी सकाळी सुमारे १०.२० वाजता उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबन तालो मांझी (वय ४२, मूळ रहिवासी झारखंड) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. ते जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या लेबर कॉलनीमध्ये वास्तव्यास होते.
याप्रकरणी त्यांचा सहकारी नंदकु बीको मांझी याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी नंदकु मांझी हा जबन मांझीच्या खोलीत गेला असता, खोलीतील लोखंडी बारला रस्सीच्या सहाय्याने जबन मांझीने गळफास घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. ही बाब निदर्शनास येताच त्याने तत्काळ इतर कामगारांना माहिती दिली आणि नंतर जयगड पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली.
माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

