(रत्नागिरी)
तालुक्यातील सोमेश्वर येथे एका विवाहित महिलेने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवारी) दुपारी उघडकीस आली. रमिजा इफ्तिकार हुश्ये (वय ३८, रा. सोमेश्वर, ता. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शनिवारी सकाळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून तिचा शोध सुरू करण्यात आला होता.
दरम्यान, सोमेश्वर येथील पुलावर महिलेची ओढणी आणि चप्पल आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
महिलेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे सोमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

