(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल ग्रामपंचायत हद्दीतील बाजारवाडी परिसरात चार दिवसांपूर्वी एका विहिरीत बैल पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. परिसरात अचानक तीव्र दुर्गंधी पसरल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला. पाहणी केली असता विहिरीत एक अज्ञात बैल मृत अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पाचल ग्रामपंचायतीचे सरपंच बाबालाल फरास, सदस्य विनायक सक्रे, ग्रामविकास अधिकारी के. वाय. पाटील आणि मुख्य लिपिक कल्पेश सुतार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बैलाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्याने मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता.
गाव पातळीवरच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरपंच बाबालाल फरास, ग्रामपंचायत अधिकारी कांबळे, मुख्य लिपिक कल्पेश सुतार तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी प्रयत्न केले. मात्र मृतदेह अत्यंत सडलेला असल्याने तो विहिरीतून बाहेर काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
परिसरातील दुर्गंधी कमी करण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी पाचल ग्रामपंचायतीने तातडीची उपाययोजना केली. विहिरीत जंतुनाशक म्हणून ब्लिचिंग पावडर तसेच विघटन प्रक्रिया वेगाने होण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर टाकण्यात आली. या उपायांमुळे दुर्गंधी नियंत्रणात आणण्यास मदत झाली असून पुढील आवश्यक कारवाईसाठी प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

