(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील नाटे येथे गेली तब्बल ४३ वर्षे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्याची परंपरा कायम राखली गेली आहे. या परंपरेनुसार यंदाही शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी नाटे येथे भव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंघर्ष संघटना नाटे (ग्रामस्थ मंडळ) यांच्याकडून देण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थ, युवक आणि शिवभक्त यांच्या सक्रिय सहभागातून हा उत्सव दरवर्षी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असतो.
उत्सवाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता सडापेठ येथील गणपती मंदिरात शिवप्रतिमेच्या पूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता किल्ले घेरा यशवंतगड येथे शिवमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. पुढे सकाळी १०.३० वाजता शिवप्रेमी युवकांच्या सहभागातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमधून शिवजयंतीचा संदेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यात येणार आहे.
दुपारी २.०० वाजता किल्ले यशवंतगड येथून ग्रामपंचायत नाटेपर्यंत शिवमूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत लेझीम पथक, ढोलपथक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक देखावे सादर करण्यात येणार असून मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि शिवभक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
सायंकाळी ६.०० वाजता मिरवणुकीचे सभेत रूपांतर होणार असून यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता सभा समाप्त होऊन राष्ट्रगीत आणि प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
नाटे येथे शिवजयंती उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या एकोप्याने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून या उत्सवाला परिसरातील शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. यंदाही सर्व बंधू-भगिनींनी, युवकांनी व मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाची आणि मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन शिवसंघर्ष संघटना नाटे (ग्रामस्थ मंडळ) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

