(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा चवे येथे भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेतील १५ वे पुष्प ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चवे येथील बुद्धविहारात संपन्न झाले. ग्रामशाखेचे अध्यक्ष आयु. प्रशांत अशोक यादव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ या विषयावर बौद्धाचार्य व माजी श्रामणेर आयु. दीपक जाधव यांनी सविस्तर विवेचन केले.
ग्रामशाखेचे सचिव आयु. अमित अनंत यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रवचनकार आयु. दीपक जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. प्रशांत यादव तसेच उपस्थित जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला सैनिक आणि ग्रामशाखा महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. यानंतर सामूहिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. ग्रामशाखेच्या वतीने प्रवचनकारांसह उपस्थित जिल्हा व तालुका शाखांचे पदाधिकारी, तालुक्यातील माजी श्रामणेर, बौद्धाचार्य आणि महिला सैनिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु. प्रीतम सावंत यांनी ग्रामशाखा व महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवांचे वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पुष्प देऊन अभिनंदन केले.
पाली विभागाचे उपाध्यक्ष तथा तालुका संघटक दिलीप वासनिक यांनी वर्षावासाचे महत्त्व विशद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. बुद्ध धम्माचा इतिहास आणि संस्कृती सम्राट अशोककालीन स्तंभ, लेणी व स्तूपांमध्ये जतन झालेली असून, धम्माचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी धम्मलिपी आणि पाली भाषेचा अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक नागरिकांनी धम्मलिपी व पाली भाषा वर्गांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी वर्षावासाचे आयोजन केल्याबद्दल ग्रामशाखेचे अभिनंदन केले.
तालुका संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी समता सैनिक दलाच्या निर्मितीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगितले. तालुक्यातून अधिकाधिक समता सैनिक तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे नमूद करून, तालुका शाखेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या समता सैनिक शिबिरात ग्रामशाखेतील तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रवचनकार आयु. दीपक जाधव यांनी ‘माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना रमाईंच्या जीवनातील संघर्ष, त्यांचे अडचणींतील बालपण, कष्टमय जीवन, निस्सीम त्याग आणि दुःखाला धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती यांचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संसाराची जबाबदारी सांभाळताना माता रमाईंनी केलेले कष्ट आणि बाबासाहेबांच्या समतेच्या लढ्यात दिलेली मोलाची साथ त्यांनी विविध प्रसंगांच्या माध्यमातून स्पष्ट केली.
माता रमाई यांच्या त्यागी वृत्तीमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंचितांच्या उद्धारासाठी यशस्वी लढा उभारता आला, असे प्रतिपादन आयु. दीपक जाधव यांनी केले. हालअपेष्टा सहन करूनही स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या रमाईंचा प्रवास समस्त भारतीय स्त्रियांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या संघर्षमय जीवनाचे हृदयस्पर्शी वर्णन ऐकताना उपस्थित उपासक व उपासिका भावनावश झाले.
ग्रामशाखेचे सभासद, तालुका प्रचार व पर्यटन विभागाचे सचिव तसेच माजी श्रामणेर व बौद्धाचार्य आयु. अशोक यादव यांनी मनोगत व्यक्त करत प्रवचनकारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी बुद्ध धम्माची वैशिष्ट्ये सांगून धम्माचे आचरण करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु. प्रीतम सावंत यांच्या हस्ते ग्रामशाखेतील इयत्ता दहावी व बारावीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात आयु. प्रशांत यादव यांनी वर्षावासाचे महत्त्व स्पष्ट करून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्यांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांचे आभार मानले. ग्रामशाखेचे सचिव आयु. अमित यादव तसेच तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु. प्रीतम सावंत यांनीही उपस्थितांचे आणि ग्रामशाखेचे आभार व्यक्त केले. ग्रामशाखेच्या वतीने आयु. अमित यादव आणि तालुका शाखेच्या वतीने आयु. प्रीतम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सरणत्तय ग्रहणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला तालुका शाखेचे सचिव सिद्धार्थ जाधव, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष प्रीतम सावंत, संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार, प्रचार व पर्यटन विभागाचे सचिव अशोक यादव व आदेश कांबळे, संरक्षण विभागाचे सचिव प्रमोद जाधव, तालुका संघटक सुरेश जाधव व राहुल जाधव, ज्येष्ठ माजी श्रामणेर व बौद्धाचार्य गौतम सावंत आणि अनिल जाधव, महिला सैनिक शुभांगी कांबळे व रचना पवार, जिल्हा पाली भाषा विभागाचे उपाध्यक्ष तथा तालुका संघटक दिलीप वासनिक सर तसेच जिल्हा संघटक, माजी श्रामणेर व बौद्धाचार्य तानाजी कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाला उल्लेखनीय उपस्थिती लाभली. शेवटी ग्रामशाखेच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली.


