(राजापूर)
राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी बुधवारी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या निमित्ताने राजापूर नगर परिषदेत गेले चार वर्षे सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कारभाराला सुरुवात झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी महायुतीच्या उमेदवार सृष्टी ताम्हणकर यांचा पराभव करत विजय मिळवला. या निवडणुकीत एकूण २० नगरसेवकांपैकी दहा जागांवर महाविकास आघाडी तर दहा जागांवर महायुतीचे नगरसेवक निवडून आले आहेत.
पदभार स्वीकारण्यापूर्वी जवाहर चौकात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ॲड.खलिफे यांनी राजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. “राजापूरकरांनी दाखवलेल्या विश्वासाला कामातून न्याय देऊ,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
यानंतर त्यांनी जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच दरग्यावर चादर चढवून प्रार्थना केली. नगर परिषदेत प्रवेश करताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण करून स्वागत केले, तर प्रशासनाच्या वतीने कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार गणपत कदम, जमिर खलिफे, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, काँग्रेस तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, उबाठा गटाचे रवींद्र डोळस व संजय पवार, काँग्रेस शहर प्रमुख आजिम जैतापकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष सातोसे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

